Wednesday 3 June 2015

२९ एप्रिल २०१५, TISS येथील बैठकीतील महत्वाचे मुद्दे व निर्णय

1) वेगवेगळ्या संघटनांत काम करणारे आपण एकत्रितपणे हा एक स्वतंत्र मंच का तयार करत आहोत, आपल्याला काय वेगळे साधायचे आहे तसेच काय वेगळे करायचे आहे, याविषयी बराच खल झाला. ‘जनकेंद्री सामाजिक, राजकीय जाणिवा (खास करुन नव्या पिढीत) जागृत करणे’ हे या मंचाचे ध्येय राहील, या सूचनेला सर्वसाधारण मान्यता मिळाली. ‘जनकेंद्री’चे अधिक नेमके स्पष्टीकरण असलेले शब्द/संकल्पना वापरुन दोन-तीन ओळीत बसेल एवढे एक ‘विधान’ तयार करावे. 
2) तरुण कार्यकर्त्यांचे जाळे विणणे हे मुख्य लक्ष्य राहील. 
3) या प्रक्रियेत सहभागी मंडळींच्या विविध प्रकारच्या व पातळीवरच्या राजकीय धारणा व अपेक्षा असू शकतात. त्या सर्व ‘सम्यक संवाद’ वर लादण्याचा आग्रह राहू नये. किमान सहमतीची भूमिका घ्यायला हवी. ही भूमिका हळू हळू विकसित करावी. 
4) तरुण पिढीचे पुरोगामी चळवळीविषयीचे आजचे आकलन, समजुती, गंड, निरक्षरता लक्षात घेता तिला समजतील, रुचतील अशा प्रकारचे कार्यक्रम व मांडणीची भाषा हवी. तथापि, हे करताना आपल्याला काय साध्य करायचे आहे, याचे भान ढळू देता कामा नये. 
5) संजीव चांदोरकर व सुरेश सावंत यांच्या टिपणातून आलेल्या दिशा व कार्यक्रमांच्या अनुषंगाने अनेक सूचना आल्या. उदा. 1. फिल्म क्लब व आणखी एक असे महिन्यातून किमान २ कार्यक्रम होतील, असे पहावे. 2. सम्यक संवादच्या वेबसाईटवर संकलित मजकुराबरोबरच स्वतंत्र लिखाण टाकले जावे. त्यासाठी तसे लेखक पहावेत. 3. फेसबुक पेज अधिकाधिक Like करण्याची मोहीम करावी. त्यावर जाणीवपूर्वक काही चर्चा सुरु कराव्यात. 4. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जन्मवर्षानिमित्त काही खास कार्यक्रमांची मोहीम घ्यावी. सप्ताह साजरा करावा. त्यातून बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची विविध अंगे प्रचारली जावीत. रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडणारे खुले पत्र लोकांना समजून सांगावे. वितरित करावे. 5. आपले म्हणणे प्रचारणारे कलापथक-पथनाट्ये बसवावीत. 6. महाविद्यालयांमध्ये-शाळांमध्ये संविधानाच्या सरनाम्यातील मूल्ये समजावून सांगण्याचे कार्यक्रम घ्यावेत. 
6) फिल्म क्लबच्या समन्वयाची जबाबदारी गौरव व सोनाली यांनी घेतली. यावेळची फिल्म २३ मे च्या शनिवारी दाखवावी. ‘सामना’ सिनेमा व त्यावर नंदू माधव, गिरीश कुलकर्णी यांच्यासमवेत महाराष्ट्रातल्या राजकारणातले गेल्या ४० वर्षातले बदल या विषयावर चर्चा असा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करावा. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सहकार्याने असा कार्यक्रम करता येईल का याची दत्ता बाळसराफांशी बोलून चाचपणी करावी. तसे ठरल्यास अधिक लोकांना बोलवावे. दादर श्रमिकलाच करावयाचा असल्यास ३०-३५ पेक्षा अधिक लोक बोलावू नयेत. 
7) पुढची बैठक ८ जून २०१५ रोजी दुपारी ३ वा. टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे संजीव चांदोरकर उपलब्ध करतील त्या खोलीत होईल. 
8) दरम्यान, संजीव चांदोरकर व सुरेश सावंत यांच्या टिपणावर अधिक विचार करुन आपल्या सूचना पाठवाव्यात. उद्दिष्टाचे (ध्येय) विधान, संघटनात्मक रचना, आर्थिक व अन्य संसाधने, कार्यक्रम यांविषयीच्या सूचना द्याव्यात. (मला वाटते, या सर्वांची चर्चा ईमेल तसेच Whatsapp गटाद्वारे चालू शकते. बैठकीपर्यंत त्यांना काही निश्चित व्यवहार्य आकार यायला त्यामुळे मदत होईल.) 
9) आता ठरवलेल्या उद्दिष्ट व कार्यकक्षेच्या चौकटीत कोणाला काही कार्यक्रम सुचले व करावेसे वाटले, तर त्यांनी ते जरुर करावेत. इतरांना त्याची माहिती मात्र नक्की द्यावी. 
10) हा एक वेगळा प्रयोग आपण करत आहोत. त्याची स्पष्टता यायला अवधी लागेल. त्यादृष्टीने आपण सगळ्यांनी सजग व क्रियाशीलतेने चर्चेत व कार्यक्रमात सहभाग देणे गरजेचे आहे. 
यावेळी बैठकीला संजीव चांदोरकर, उल्का महाजन, सुनील गजाकोश, उमेश खाडे, महेंद्र रोकडे, गौरव तोडकर, सोनाली शिंदे, सुरेश सावंत, दत्ता बाळसराफ, नागेश जाधव, महेश कांबळे अशा ११ जणांना निमंत्रित केले होते. ज्यांचा आधीच्या प्रक्रियेशी संबंध आहे, जे या संकल्पनेशी स्वतःला अधिक जोडून घेऊ इच्छितात अशांची ही नावे होती. असे लोक अजूनही असू शकतात. तथापि, प्राथमिक तयारीच्या बैठका या Brain storming पद्धतीच्या राहणार असल्याने ही संख्या तूर्त मर्यादित राहणे व तेच लोक बैठकीला असणे गरजेचे आहे. 
यावेळच्या बैठकीला दत्ता, नागेश व महेश उपस्थित राहू शकले नव्हते. पुढच्या ८ जूनच्या बैठकीला हे सगळे अपेक्षित आहेत. अगदी कोणाला असे वाटत असेल की यात काही विशिष्ट नावे असणे गरजेचेच आहे, तर त्यांनी ती नावे whatsapp गटावर टाकावीत, मेल करावीत. ही मेल मी तुम्हा सगळ्यांना पाठवताना to च्या पुढे सगळ्यांचे मेल आयडी असतील. ते तुम्ही तुमच्याकडे सम्यक संवाद असा गट करुन त्यात save करुन ठेवावेत. तसेच reply करताना reply to all क्लिक करावे, म्हणजे सगळ्यांना ती मेल जाईल. 
४ तासांची ही बैठक वर म्हटल्याप्रमाणे वेगळा प्रयोग करत असल्याने चाचपडण्याची राहिली असली तरी उमेद वाढवणारी होती. हा प्रयोग कसा व कितपत पुढे जाणार हे ठाऊक नसले तरी अशा प्रयोगाची आवश्यकता मात्र सगळ्यांनाच पटलेली होती. 
सोनालीने बैठकीची सविस्तर टिपणे घेतली आहेत. अजून काही तपशील कोणाला हवे असल्यास त्या टिपणांत मिळू शकतील. त्या टिपणांच्या आधारे औपचारिक अहवाल सोनालीने करणे, यास वेळ लागला असता म्हणून मी हा संक्षिप्त, सूत्ररुपातला वृत्तांत माझ्या समजानुसार केला आहे. काही महत्वाच्या नोंदी राहून गेल्या असतील अथवा मी केलेली नोंद दुरुस्त करायची असेल, तर ती दुरुस्ती/भर घालून तुम्ही पुन्हा सगळ्यांना हा वृत्तांत पाठवावा.

- सुरेश सावंत

No comments:

Post a Comment