Thursday 11 June 2015

'सम्यक संवाद' बैठक, ९ जून २०१५ चा संक्षिप्त वृत्तांत

ही बैठक TISS येथे संजीव चांदोरकरांच्या कार्यालयात झाली. उल्का महाजन, गौरव तोडकर, संजीव चांदोरकर व सुरेश सावंत या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीतील चर्चेतून पुढे आलेले महत्वाचे मुद्देः
  1. सम्यक संवाद या मंचाने स्वतःची अशी जाहीर भूमिका घेऊ नये. विविध भूमिकांची चर्चा करण्यासाठीचा तो मंच राहावा. 'गांधी मला भेटला' या कवितेच्या वादानिमित्त काही व्यक्तींच्या नावे निवेदन काढण्यात आले. तीच पद्धत अवलंबली जावी. वर्तमान व भविष्यकाळात आपल्याशी जोडल्या जाणाऱ्यांना त्यामुळे मोकळीक राहील. अर्थात, संंविधानातल्या मूल्यांप्रती हा मंच निश्चित बांधील आहे.  
  2. फिल्म क्लबः
    1. हा उपक्रम चालवण्यासाठी सोनाली, गौरव, श्याम, विनोद व नागेश यांची 'फिल्म क्लब संयोजन समिती' करावी. गौरव व सोनाली यांनी त्याच्या समन्वयाची जबाबदारी घ्यावी.
    2. सिनेमा दाखवण्यासाठी महिन्याचा निश्चित दिवस ठरवावा. तो दुसरा  शनिवार असावा.
    3. दरमहिन्याच्या सिनेमाचा खर्च भागविण्यासाठी या वर्षातील खर्चासाठी १० हजार रुपयांचा निधी जमा करावा. १०००, ५००, १०० रुपये ज्याची जशी इच्छा व ऐपत असेल, त्याप्रमाणे जमा करावे. कोणावरही सक्ती करु नये. फिल्म क्लब संयोजन समितीने या रकमेचा हिशेब ठेवून विशिष्ट मुदतीनंतर तो लोकांना जाहीर करावा. तूर्त पावती वगैरेची औपचारिकता करण्याची गरज नाही. (संजीव चांदोरकर यांनी १००० रुपये बैठकीतच दिले. ते सुरेश सावंत यांच्याकडे तूर्त जमा आहेत.)
    4. गेल्या महिन्यात सामना सिनेमा व त्यानिमित्ताने ४० वर्षातील राज्यातील राजकारणातील बदलांची चर्चा या कार्यक्रमाची निश्चिती होऊ शकली नाही. या महिन्यात ती करण्याच्या दृष्टीने उल्का महाजन दत्ता बाळसराफांशी बोलणार आहेत. तदनंतरचा पाठपुरावा फिल्म क्लब समितीने करावा.
  3. नवे उपक्रमः
    1. खळबळ मनातलीः तरुण मंडळींना पडणारे विविध प्रश्न त्यांनी मोकळेपणाने विचारावेत व त्यांची चर्चा व्हावी, यासाठी हा उपक्रम आहे. आपल्याशी संबंधित तरुण मंडळींना (२५-३०) यासाठी निमंत्रित करावे. दादर श्रमिक अथवा अन्य सोयीच्या ठिकाणी २-३ तासांची ही बैठक करावी. संजीव चांदोरकर या बैठकीचे संचालन करतील. त्यांनी यासंबंधीची संकल्पना स्पष्ट करणारे वाटसरुमधील निवेदन स्वतंत्र मेलद्वारे आपल्याला पाठवलेले आहे. सोनाली, गौरव, उमेश यांनी या उपक्रमाची चाचपणी तरुणांत करावी व त्याबाबत संजीव चांदोरकरांशी बोलावे.
    2. संविधान सरनामा जागरणः संविधानाच्या प्रास्ताविकातील मूल्यांचे जागरण महाविद्यालये, शाळा, संघटनांचे कार्यकर्ते तसेच अन्य ठिकाणी करायला हवे. त्यासाठी आपल्यात प्रथम या मूल्यांचा आशय व मांडणी यांची स्पष्टता येणे गरजेचे आहे. ती आणण्यासाठी एक बैठक पनवेलला उल्का महाजन यांच्या घरी गुरुवारी १८  जून २०१५ रोजी सकाळी ९.३० वा. ठेवण्यात आली आहे. बैठक किमान ४ तास चालेल. (डबा आणण्याची गरज नाही. जेवणाची व्यवस्था उल्का महाजन करणार आहेत.) या बैठकीसाठी उल्का, सोनाली, गौरव, सुरेश व उमेश एवढे लोक निश्चित असणार आहेत. इतरांपैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याप्रमाणे आधी कळवावे. या बैठकीची पहिली मांडणी सुरेश सावंत करणार आहेत. त्यांची यासंबंधातली टिपणे खाली जोडली आहेत.
धन्यवाद.
आपला,
सुरेश सावंत

No comments:

Post a Comment