या बैठकीची प्रक्रिया विशद करणारा लेख लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. त्याप्रमाणे हा वृत्तांत लिहिला आहे. मुद्दे म्हणून लिहिताना काहींच्याच नावांचा उल्लेख केला आहे. सगळ्यांचा उल्लेख करणे मला शक्य झाले नाही. या लेखातील जे मुद्दे योग्यरीत्या अथवा पुरेसे स्पष्टपणे मांडले गेलेले नाहीत अथवा चुकीचे आहेत, असे वाटल्यास आपण ते अवश्य दुरुस्त करावेत. ब्लॉगवरच असल्याने ते सहज दुरुस्त करता येतील. आपल्या सूचना खाली comments मध्ये लिहाव्यात तसेच ईमेल कराव्यात.
अनेकदा मोर्चे, आंदोलने झाल्यावर अनौपचारिक चर्चांत ‘आपण एवढे काम करुनही राजकीय हस्तक्षेपाची ताकद निर्माण होत नाही’ तसेच पुरोगामी प्रवाहांमध्ये मतभेदांबरोबरच जे ‘सामायिक पुरोगामी’पण आहे, त्यावर ‘व्यापक एकजूट का होत नाही’ असे प्रश्न परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बोलण्यात येत असतात. परिवर्तनवादी चळवळी म्हणत असता, सर्वसाधारणपणे कम्युनिस्ट, समाजवादी, फुले-आंबेडकरवादी तसेच लोकशाही-मानवतावादी प्रवाह इथे गृहीत आहेत. या चर्चेला काही औपचारिक स्वरुप द्यावे, या हेतूने आम्ही (उल्का महाजन, दत्ता बाळसराफ व सुरेश सावंत) वैयक्तिक पातळीवर एक बैठक बोलवायचे ठरवले.
या चर्चेत कोण सहभागी होऊ शकते, याविषयी ज्या काही सूचना आल्या त्यानुसार ३०ते ५० वयोगटाच्या आसपास असलेल्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करावे, असे आम्ही ठरवले. स्वातंत्र्य, संयुक्त महाराष्ट्र, युक्रांद, पँथर आदि चळवळींतील प्रत्यक्ष सहभागातून प्राप्त झालेल्या ऐतिहासिक ओझ्यांचे (लहान वयामुळे अथवा जन्मच झालेला नसल्याने) जे वाहक नाहीत, तथापि, त्यांचा प्रगतीशील वारसा मानणा-या तसेच या संदर्भांचा परिचय असलेल्या कार्यकर्त्यांचा मुख्यतः हा विचारविनिमय असावा, अशी अपेक्षा होती. अर्थात, या वयोगटाच्या वर असलेल्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. यात अभ्यासक, पत्रकार, विचारवंत तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही सहभाग होता.
जागेचा विचार करत असताना साने गुरुजी स्मारकाच्या संचालकांनी सहकार्याचा हात पुढे केला. बैठकीची निमंत्रणे तसेच अन्य समन्वयाच्या व व्यवस्थेच्या जबाबदारीसाठी आमचे कार्यकर्ते मित्र उमेश खाडे व त्यांचे सहकारी यशवंत, सोनाली, सुनील, प्रणाली इ. मंडळी पुढे आली.
ही बैठक २५ ते २७ फेब्रुवारी २०११ या कालावधीत साने गुरुजी स्मारक, माणगाव, जि. रायगड येथे झाली. या बैठकीस जवळपास ९५ जणांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यातील सुमारे ५० जणांनी आपण येणार असल्याचे कळवले होते. प्रत्यक्षात विविध कारणांनी यातील अनेकजण येऊ शकले नाहीत. या बैठकीस प्रत्यक्ष उपस्थितांची संख्या ४० होती. अनेक जणांना आमच्याकडून निमंत्रण द्यायचे राहून गेले होते.
‘राजकीय हस्तक्षेपाची ताकद’ व ‘व्यापक एकजूट’ या दोन मध्यवर्ती मुद्द्यांचा शोध १) आपापल्या जनसंघटना २) पुरोगामी राजकीय पक्ष व त्यांच्या आघाड्या तसेच ३) अन्य सामाजिक, सांस्कृतिक संघटना या ३ घटकांमधून घेणे, त्यावरील संभाव्य उपाय व उपक्रमांची नोंद करणे, या उपाय व उपक्रमांवर चर्चा करुन सहमतीच्या उपाय व उपक्रमांची यादी करणे... हा या बैठकीचा सर्वसाधारण कार्यक्रम होता.
पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील चर्चेसाठी काही मुद्दे ठरवण्यात आले होते, ते असेः
१. मुद्द्यांवरचे लढे राजकीय ताकदीत रुपांतरित होताना दिसत आहेत का ? नसतील तर त्याची कारणे कारणे काय?
२. पुरोगामी शक्तींच्या एकजुटीसमोरील आव्हाने कोणती ?
३. सैद्धांतिक दिशा किंवा विचारधारा आजच्या संदर्भात तपासण्याची गरज आहे काय ? असल्यास कशाप्रकारे ?
४. वर्गीय जाणिवा जाग्या होताना दिसत आहेत का ? दिसत असल्यास कशाप्रकारे ? नसल्यास त्याची कारणे काय?
यानंतर ‘राजकीय हस्तक्षेप’ हे सूत्र दुस-या सत्रातील चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. दुस-या दिवशी ‘व्यापक एकजूट’ या सूत्रावर चर्चा होणार होती तर तिस-या दिवशी, उपाय, संभाव्य आकृतिबंधासंबंधी चर्चा अशी ही ३ दिवसांची रचना करण्यात आली होती.
पहिल्या दिवशीच्या चर्चेला आलेले काहीसे विस्कळीतपण सोडले तर बाकीची सर्व चर्चा ब-यापैकी सुसूत्र झाली. एकूण चर्चेला मदतकारक होण्याच्या दृष्टीने दुस-या दिवशी डॉ. यशवंत सुमंत यांचे ‘राज्यसंस्थेचे बदलते स्वरुप’ या विषयावर खास व्याख्यान ठेवण्यात आले होते.
या ३ दिवसांत झालेल्या चर्चेतील काही महत्वाचे मुद्दे व व्यक्त झालेली मते संक्षिप्त स्वरुपात खाली देत आहेः
· बदलत्या वातावरणात मुद्द्यांवरची लढाई आपण समग्र करु शकलो नाही. आज बाहेर लोकांसमोर विश्वासार्ह नेतृत्व नाही. पुरोगामी परंपरेतील कार्यकर्ते त्यांना विश्वासार्ह वाटतात. पण त्या मुद्द्यापुरताच त्यांचा संबंध राहतो. अन्य प्रश्नांसाठी लोक आजच्या प्रचलित राजकीय कार्यकर्त्यांकडे जातात. त्या अनेकविध प्रश्नांच्या, अडचणींच्या सोडवणुकीसाठी आपण लोकांना उपलब्ध नसतो. चळवळींत कप्पेबंदपणा आला आहे. त्यांत विखंडितपणा वाढतो आहे. एकसंधता दिसत नाही.
· आज महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीचे एन.डी.पाटील व भाई वैद्य हे दोन खुंटे आहेत. त्यांची व्यापक मान्यता लक्षात घेता ते योग्यही आहे. तथापि, त्यांची वये लक्षात घेता राज्यव्यापी प्रतिमा असलेली नवी नेतृत्वं आपण उभी करणे आवश्यक आहे. असे नेतृत्व करु शकणारे कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत. पण ते स्वतःला एकएका प्रश्नापुरते सीमित करुन आहेत.
· मध्यपूर्वेतील घडामोडी किंवा लॅटिन अमेरिकेतील बदल लक्षात घेतले तर आज जनकेंद्री डावे आंदोलन उभा राहण्याचा काळ आहे का, याचा विचार करावा करायला हवा. लाटा आदळणार आहेत. लोक पक्षाची वाट बघणार नाहीत. अशावेळी आंदोलन व पक्ष यांचा विचार एकत्रच करणे आवश्यक आहे का ? ....या प्रश्नावरील चर्चेत याप्रकारेही मत व्यक्त झालेः अभिजात अर्थाने कम्युनिस्ट पक्ष हे वैचारिक केंद्र असते, तो सत्ता हातात घेत नसतो, पक्षाकडून मिळालेल्या मार्गदर्शनाप्रमाणे जनआंदोलनात अन्य पुरोगामी शक्तींशी लोकशाही निर्णयप्रक्रियेने पक्षकार्यकर्ता सहकार्य करतो. त्यामुळे जनआंदोलन व पक्ष यांत द्वैत उभे राहण्याचा प्रश्नच येत नाही.
· औद्योगिक भांडवलशाहीचा अंत होऊन आता वित्तीय भांडवलशाहीचा काळ सुरु झाला आहे. आजच्या प्रश्नांना एकास एक असे उत्तर नाही. गुंतागुंत वाढली आहे. केवळ फुले-आंबेडकर आपल्याला तरुन नेणार नाहीत.
· आज संगणक क्रांती सर्वव्यापी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज या क्षेत्रात पुढे येतो आहे. संगणकाला एकेकाळी झालेला विरोध अनाठायी होता. भांडवलशाहीतूनच पुढची अवस्था येणार आहे. अशावेळी भांडवलशाहीने जन्माला घातलेल्या तंत्रसाधनांचा वापर नाकारणे अयोग्य आहे. ....या मतांच्या बरोबर विरोधी मतही व्यक्त झाले. संगणकाला विरोध हा त्यामुळे येणा-या बेकारीला विरोध होता. तो बरोबरच होता. आज ओबीसी समाज या क्षेत्रात दिसत असला तरी सूत्रे कोणाच्या हातात आहेत, हे पाहणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान व जागतिकीकरण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तंत्रज्ञानाला पाठिंबा असणारे जागतिकीकरणाच्या विरोधात असू शकतात. तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीने लोकांचे जीवनमान उंचावते, असे नव्हे.
· जुन्या काळात चळवळींना मिळणारा प्रतिसाद आणि आताचा क्षीण प्रतिसाद या स्थितीस आपली वैचारिक धारणा कारण आहे. वर्गाला जसे आपण महत्व दिले, तसे जातीप्रश्नाला दिले नाही. डाव्या नेतृत्वाच्या तात्त्विक, व्यावहारिक मर्यादा आजच्या स्थितीस कारण आहेत. कोणत्याही एकजुटीसाठी वैचारिक एकजूट सर्वाधिक महत्वाची असते.
· आपल्या एकजुटीच्या आड फक्त वैचारिक मतभेदांपेक्षाही इतर अनेक बाबी कारण आहेत. एकाच प्रश्नावर काम करणा-या संघटनांची जूट न होण्यात नेतृत्वाचे वैयक्तिक अहंगंड आड येतात. वैचारिकतेपेक्षाही खरे म्हणजे या अन्य बाबीच अधिक परिणाम घडवतात.
· काहीवेळा तात्पुरत्या लाभासाठीची सबगोलंकारी एकजूट ही भविष्याच्या दृष्टीने मारक ठरते. ‘रिडालोस’वर अनेकांनी यासंदर्भात मते व्यक्त केली. ती फसवी एकजूट होती, ही सर्वसाधारण प्रतिक्रिया होती.
· लोकांकडे सत्ता जाणे, लोक सिद्ध होणे-प्रसंगी संघटना क्षीण झाली तरी चालेल-यास महत्व द्यायला हवे. याचा अर्थ, राज्य किंवा केंद्र या सत्तांना कमी लेखणे नव्हे. ‘मेंढालेखा’ने पुढे आणलेली ‘दिल्ली-मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार’ ही घोषणा पूर्णत्वाने लक्षात घेणे आवश्यक आहे.
· विकासप्रक्रियेचा लाभ दलित, मुस्लिमांना होतो, पण गावातील निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग नसतो. त्यांची सिद्धता कशी करायची ?
· जातीलाच जातीचे दुखणे कळते, ते इतरांना कळू शकत नाही, हा विचार योग्य आहे का ?
· बचत गट तसेच ग्रामपंचायतीतील महिलांच्या प्रवेशाने जे नवे चैतन्य महिलांच्यात मोठ्या प्रमाणात दिसते आहे, त्याची योग्यप्रकारे नोंद आपल्याकडून घेतली जाते, असे वाटत नाही.
· वैचारिक मतभेद तीव्रतेने मांडले जाण्यात गैर काही नाही. पण जराही वेगळे बोलणारा आमच्यातला नव्हे, अशी भूमिका घेतली जाते, हे बरोबर नाही. व्यापक आघाडीत वैचारिकतेचे टोक किती गाठायचे याला मर्यादा असावी लागते. यासंबंधातल्या चर्चेत भाग घेताना संजीव चांदोरकर यांनी भांडवलदारांच्या या संदर्भातल्या वागण्याचा दाखला दिला. भांडवलदार कितीही आपसात भांडले तरी परस्परांच्या धंद्याला खोट बसू देत नाहीत. त्यांचे हितसंबंध आपल्यापेक्षा कितीतरी जास्त असतात. तरीही ते हा समज दाखवतात. आपण तर ‘ओसाड’ गावचे राजे. आपण हा समज दाखवत नाही. ‘वैचारिक पाया’ ची चर्चा तासन् तास चालते. पण एकत्र कसे राहायचे, याची चर्चा, त्याचे यमनियम आपण ठरवत नाही. भांडवलदार लांब पल्ल्याची आखणी करतात. आपल्यालाही जे करायचे आहे, ते पुढच्या पिढीसाठी, हे आपण लक्षात घ्यायला हवे, असे ते म्हणाले.
· आपण निवडणुका लढायला घाबरतो. घाण साफ करायची तर नाल्यात उतरावे लागते. नाल्यात उतरले की थोडी घाण आपल्या अंगावरही उडणार. त्यास आपण घाबरता कामा नये, असे मत पिंपरी चिंचवडचे नगरसेवक मारुती भापकर यांनी स्वतःच्या अनुभवांच्या आधारे मांडले.
· डॉ. यशवंत सुमंत यांनी बदलत्या राज्यसंस्थेचे स्वरुप स्पष्ट करताना ९० नंतरच्या उत्तर औद्योगिक काळात संस्थीभवनाचे पॅटर्न बदलल्याचे नमूद केले. औद्योगिक भांडवलशाहीने राष्ट्रराज्य संकल्पना व गतिमानता दिली. आता सिटिझन ऐवजी नेटिझन व्हायला लागलो आहोत. तंत्रज्ञान नाकारणे हे अनैतिहासिक आहे. तथापि, वाढत्या कनेक्टिव्हिटीत मानवी प्राण कसे ओतणार हा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. कामगार व किसान हे चळवळीचे आधार या पूर्वीच्या अर्थाने आता कालबाह्य झाले आहेत. नव्या मध्यमवर्गातले काही जण निराभास होत आहेत, हे लक्षात घेऊन त्यांच्याशीही संबंध जोडले पाहिजेत, असेही ते पुढे म्हणाले. चर्चेच्या पुढच्या क्रमात बोलताना त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. नवी चिकित्सा उभी करणारे त्या त्या जातीत, समाजविभागांत उभे राहायला हवेत. तसे काही उभे राहतही आहेत. त्यांना आपण बाहेरुन साथ द्यायला हवी. ते एकटे पडता कामा नयेत, असे मुद्दे त्यांच्या मांडणीत होते. ...त्यांच्या मांडणीवर चर्चा करताना वित्त भांडवलाचं अस्तित्व औद्योगिक भांडवलावर असते, अशी थोडी सैद्धांतिक चिकित्साही झाली.
· काही जुन्या समजुतींसमोर नव्या संशोधनाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे, असे मिलिंद बोकीलांचे म्हणणे होते. प्राचीन काळी आदिम समाज हा स्त्रीसत्ताक होता, या समजुतीचा फेरविचार करायला हवा तसेच एकलव्याचा अंगठा मागणा-या द्रोणाचार्यांच्या हेतूबद्दल शंका नसली तरी जगात कोणीही आदिवासी बाण सोडताना अंगठ्याचा वापरच करत नाहीत, अगदी ऑलिंपिकमध्येसुद्धा याचीही आपण नोंद घ्यायला हवी, असे ते म्हणाले. आर्य-द्रविड संघर्षाचा संदर्भ देत भारतीय इतिहासाचे सुलभीकरण करता कामा नये, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतात कोण कधी आले ते आपल्याला नक्की सांगता येत नाही. त्यामुळे त्या विषयी भ्रामक तर्क करू नये. नवीन संशोधनाच्या उजेडात कायम तपासून पहावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
· काही जुन्या समजुतींसमोर नव्या संशोधनाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे, असे मिलिंद बोकीलांचे म्हणणे होते. प्राचीन काळी आदिम समाज हा स्त्रीसत्ताक होता, या समजुतीचा फेरविचार करायला हवा तसेच एकलव्याचा अंगठा मागणा-या द्रोणाचार्यांच्या हेतूबद्दल शंका नसली तरी जगात कोणीही आदिवासी बाण सोडताना अंगठ्याचा वापरच करत नाहीत, अगदी ऑलिंपिकमध्येसुद्धा याचीही आपण नोंद घ्यायला हवी, असे ते म्हणाले. आर्य-द्रविड संघर्षाचा संदर्भ देत भारतीय इतिहासाचे सुलभीकरण करता कामा नये, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतात कोण कधी आले ते आपल्याला नक्की सांगता येत नाही. त्यामुळे त्या विषयी भ्रामक तर्क करू नये. नवीन संशोधनाच्या उजेडात कायम तपासून पहावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
· पुढील उपाययोजनांसंबंधी तसेच आकृतिबंधाबाबत आलेल्या काही सूचना अशा आहेतः
o नव्या कार्यकर्त्यांची तयारी करणारी शिबिरे घेण्यासाठी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकारख्या जागांचा वापर करावा. या स्मारकात अशा शिबिरांचे आयोजन करण्याची जबाबदारी राजन इंदुलकर यांनी घ्यावी, अशी सूचना गजानन खातू यांनी मांडली.
o संजीव साने यांनी केलेल्या लेखी सूचनांत राष्ट्रसेवा दलाला संघटित मदत करणे, आपापल्या कार्यक्षेत्रात, स्थानिक ठिकाणी अभ्यासमंडळे, व्याख्यानमाला, राज्यव्यापी/विभागवार परिवर्तनवादी विचारांचे सांस्कृतिक जलसे/साहित्य चर्चा यांचे आयोजन, तीन महिन्यांनी या तसेच अन्य सूचनांवर काही काम तसेच अधिक विचार करुन परत येथेचे दोन दिवसांकरता भेटावे यांचा समावेश होता.
o पुढच्या चर्चांमधून विविध समाजघटकांचे मानस तसेच राजकीयीकरण म्हणजे काय अशा मुद्द्यांची चर्चा व्हावी, कार्यकर्ता व अभ्यासक यांचा समावेश असलेले ‘विचारवेध संमेलन’ (जे सध्या थांबवण्यात आले आहे) नव्या स्वरुपात सुरु करावे, ‘सांस्कृतिक क्षेत्रातील हस्तक्षेप’ याबाबत दत्ता बाळसराफ व सुरेश सावंत यांनी तयारी करावी या सूचना उल्का महाजन यांनी केल्या.
o विविध विचारसरणींचा परिचय करुन देणारी ३ ते ५ दिवसांची शिबिरे घेण्याची जबाबदारी डॉ. यशवंत सुमंत यांनी स्वतःहून घेतली. (सध्या लोकमतमध्ये एक रविवार आड याच विषयावर त्यांचे सदर असते.)
o केशव गोरे स्मारकातून महत्वाच्या विषयांवरचे लेख झेरॉक्स करुन जिज्ञासूंना पाठवले जाण्याची व्यवस्था सुरु असल्याचे सांगून आपणही आपली यादी तेथे असलेल्या ज्योती केळकर यांच्याकडे द्यावी, असे गजानन खातू यांनी सांगितले.
o पर्यावरणीय अर्थशास्त्र या विषयावर पार्थ बापट यांनी एक शिबीर घेण्याची तयारी दाखवली.
o सांस्कृतिक राजकारण या विषयावरील उपक्रमांत अंकांची भेटयोजना, फिरती प्रदर्शने आयोजित करावीत, असे हरीश सदानी यांनी सुचविले.
o अनेक कार्यकर्ते यावेळी येऊ शकले नाहीत. या चर्चेची गरज लक्षात घेता एक सैल असा मंच तयार करावा, असे राजन इंदुलकर यांनी सुचविले.
o राज्यातल्या कार्यकर्ते, नेते यांचे प्रोफायलिंग करण्याची, रिसोर्स मॅपिंग करण्याची जबाबदारी राजू भिसे यांनी घेतली. अशारीतीच्या बैठका जिल्हा पातळीवर व्हाव्यात, अशीही सूचना त्यांनी मांडली.
o दत्ता बाळसराफ यांनी अशारीतीच्या बैठकांना दुजोरा दिला व मराठवाडा-विदर्भातल्या कार्यकर्त्यांची बैठक औरंगाबादला निलेश राऊत यांनी आयोजित करावी, अशी सूचना केली.
o राजन इंदुलकर यांनी कोकण महोत्सवासारखे उपक्रम राबवावेत अशी युवराज मोहिते यांची सूचना असल्याचे सांगितले. (युवराज मोहिते शेवटच्या दिवशी नव्हते)
o संपर्क-संवादाचे एक माध्यम म्हणून एक ब्लॉग तयार करावा तसेच आपल्या चळवळीचे साहित्य इंटरनेटवर सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी युनिकोडचा वापर वाढवला पाहिजे, अशी सूचना सुरेश सावंत यांनी केली.
o ब्लॉग, युनिकोडसंबंधीच्या वरील उपक्रमात टायपिंग करणारा गट आम्ही तयार करु असे सोनाली शिंदे यांनी सांगितले.
o विकिपीडियावरील दोन नोंदी दर महिन्याला संपादित कराव्यात, अशी सूचना चैत्रा रेडकर यांनी केली.
o या बैठकीचे निमंत्रणपत्र हे मेंदूपेक्षा हृदयाला अपील करणारे होते, असे संजीव चांदोरकर म्हणाले. पुढच्या निमंत्रणात कोणाला बोलवायचे याच्या निकषांची निमंत्रित व निमंत्रक या दोहोंना स्पष्टता असावी. किमान समान कार्यक्रम, वैचारिक व व्यवहाराच्या स्पष्टतेचा किमान आराखडा तयार व्हावा, अशी त्यांनी सूचना व अपेक्षा व्यक्त केली.
या सूचनांनंतर निमंत्रक या नात्याने दत्ता बाळसराफ, उल्का महाजन व सुरेश सावंत यांनी संबंधितांचे आभार मानून बैठक संपल्याचे जाहीर केले
- सुरेश सावंत,
sureshsawant8@hotmail.com/ ९८९२८६५९३७
तपशीलासासाठी खालील विधानांवर क्लिक करावेः
- बैठकीतील सहभागींची यादी (ही यादी तपासून दुरुस्त करावी तसेच असा संवाद ज्यांच्याशी पुढे चालू ठेवावा असे वाटते, अशांची नावे, फोन व ईमेल कळवावेत, ही विनंती.)
- बैठकीचे निमंत्रण
- बैठकीच्या कार्यक्रमासंबंधीचे टिपण
मिलिंद बोकील यांनी ईमेलद्वारे पाठवलेली प्रतिक्रियाः
ReplyDeleteप्रिय सुरेश,
सम्यक संवाद पाहिले. तुम्ही वृत्तांत उत्तम लिहिला आहे. धन्यवाद. त्यात प्रतिक्रिया कुठे करायची ते कळले नाही म्हणून इथे कळवत आहे.
शेवटी माझ्या तोंडी जी वाक्ये घातली आहेत, त्या बाबतीत: माझे म्हणणे असे होते की भारतीय इतिहासाचे सुलभीकरण केवळ आर्य द्रविड संघर्षामध्ये करू नये. मी आर्य बाहेरून आले की नाहीत यावर काही म्हणालेलो नाही. ती बीजेपी लोकांची लाईन आहे. तसे पाहिले तर भारतात सर्वच बाहेरून आले असतील. मुख्य मुद्दा कोण कधी आले ते आपल्याला नक्की सांगता येत नाही हा आहे. त्यामुळे त्या विषयी भ्रामक तर्क करू नये. नवीन संशोधनाच्या उजेडात कायम तपासून पहावे असे माझे म्हणणे होते. या विषयी संधी मिळाल्यास मी अधिक सांगू शकेन. माझ्या कातकरी: विकास की विस्थापन या मध्ये ही चर्चा आलेली आहे.
तुम्हाला शक्य असेल तर ही प्रतिक्रिया तिथे टाकावी.
कळावे,
मिलिंद
पार्थ बापट यांनी पाठवलेला मेलः
ReplyDeleteDear Sureshji,
>
> Thank you for sending me the link to this blog. You have really
> captured the essence of the meeting!
>
> By the way, in the list of participants, I find my phone number is
> wrongly written. It should be corrected to read 9922247749. Could you
> please make the necessary change?
>
> Thank you.
>
> Regards,
>
> Parth
सुरेशजी,
ReplyDelete'सम्यक संवाद' वाचला. ध्येय्ये आणि विचार यांची बैठक खूप व्यापक आहे. त्यामुळे सर्व अंगांनी आणि सर्व दिशांनी बैठकीत मंथन होणे अपरिहार्य होते. तसे ते झालेले दिसले. तुम्ही बैठकीचा वृत्तांत मु्द्देसूद लिहीलात आणि दुसरीकडे जी मंडळी तेव्हा उपस्थित नव्हती त्यांचेसाठी एक चित्रच शब्दांतून उभे केलेत. आपल्या बरोबर खूप चांगली आणि अनुभवी मंडळी आहेत. आपण ब्लॉग माध्यमाचा उपयोग केलात हे कौतुकास्पद आहे. हे माध्यम तुमच्या विचारमंथनाला नक्कीच आधारभूत ठरेल यात शंका नाही. माझ्या शुभेच्छा. - माधव शिरवळकर (mshirvalkar@gmail.com)
श्याम सोनार यांनी मेलद्वारे पाठवलेली प्रतिक्रियाः
ReplyDeleteजयभीम सुरेश भाऊ सम्यक सव्वाद यासंदर्भात वाचले .आधी तत्वज्ञान म्हंजे काय इथून सुरुवात करत एका बाजूला कोणत्या तत्वज्ञानाने काय परिवर्तन घडवले?याचा हि उहा पोहो करणे गरजेचे आहे.त्यानंतर विविध तत्वज्ञान कोणते ते पाहावे. आणि जे प्रत्यक्ष जनतेत कृतीशील आहेत त्यांना आपापले मतभेद ठेवत एकत्र येणे गरजेचे आहे.नुसते वाचून विचावंत असलेले आणि जनतेत अनुभव घेऊन काम करत विचारवंत झालेले होणारे या सगळ्यांचा विचार या ठिकाणी करणे गरजेचे आहे .आणि बिनायक सेन सुधीर ढवळे यांच्या अटकेसंदर्भात हा ब्लोग आणि त्याचे वाचक करते धरते त्यांनी यासंदर्बत बोललेले पाहिजे.नाहीतर काही लोक, आता सुधीरला जे खोट्या केसेमध्ये अटक केली आहे.ते माहित नसल्यामुळे भले भले पुरोगामी खाजगीत पोलीसांची कृती खरी मानत आहे .तुमी मर्स्क वाडी आहात तुम्छे मत काय?बोला जय्बिम श्याम सोनार 8080829499
महेश कांबळे यांनी मेलद्वारे पाठवलेली प्रतिक्रियाः
ReplyDeleteमाणगाव बैठकीत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मन:पुर्वक आभार! माझ्यासाठी हा एक ‘शैक्षणिक अनुभव’ होता. पुरेसा गृहपाठ नसल्यामुळे असेल, मला चर्चेत फारसा सहभाग घेता आला नाही. इतर कामांच्या भाउगर्दीत वेळेचेही बंधन आल्यामुळे बैठकीत पुर्णवेळ थांबता आले नाही ही खंतही आहेच. पण तरीही, हा अनुभव खूप काही शिकण्यासारखा आहे. धन्यवाद. यापुढेही मी सहभागी होण्याचा निश्चित प्रयत्न करेन...
...महेश कांबळे
2011/3/7 Chaitra Redkar
ReplyDeleteSureshji,
Dondiwasapasun mazya machine varil unicode madhe kahi tari problem zalay. devnagarimadhe lihu mhanun lagech reply kele nahi. pan ata te punha suru vhayachi vat na baghatch reply karatey.
Tumhi evadhya tatparatene blog suru kela tyabaddal abhinandan. Ek gosht vicharasathi mandavishi vatate. Jya goshti apan startegy mhanun tharvato ahot tya blog var lihilya jau nayet karan shevati blog mmhanje public forum ahe. Tithe apalya strategies ka khulya karayachya ase vatate.Konihi blog vachu shakto. Tumche ya baddal che mat jarur kalva.
..............................................
चैत्राजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ज्या इतरांना कळल्यामुळे पुढच्या नियोजनाला अडथळे तयार होतील, अशा डावपेचाच्या गोष्टी जाहीर चर्चेच्या करु नयेत, हे बरोबर. पण इथे तसे काहीच होण्याची शक्यता नाही, उलट अन्य समविचारी मंडळींना कळल्यामुळे त्यांच्याही काही सूचना येण्याची शक्यता तयार झाली, तर ते बरेच आहे. हे माझे मत झाले. तथापि, अन्य मंडळींचे म्हणणे काय आहे, हे कळण्यासाठी तुमचे मत ब्लॉगवर टाकत आहे.
....सुरेश सावंत
Chaitra
प्रिय सुरेश,
ReplyDeleteमाणगावच्या बैठकीला येऊ शकलो नाही याबद्दल दिलगीर आहे. पण या नंतरच्या कार्यक्रमांत सहभागी व्हायला नक्कीच आवडेल. हा वृत्तांत पाठवल्याबद्दल आभार. बैठकीत खूप महत्त्वाची चर्चा झाली आहे. ती पुढेही चालू रहावी. विविध विचारसरणीनचा परिचय करून देणारया शिबिरांची कल्पना फारच छान. बाकी सर्वच मुद्द्यांशी तत्त्वता सहमत आहे.
भांडवलशाही व जातीव्यवस्थेबरोबरच पितृसत्तेचा मुद्दाही ठोसपणे यावा असे वाटते.
पुढच्या शिबिराच्या तारखा लवकर कळवल्यास त्या राखून ठेवणे सोयीचे होईल.
शुभेछान्साहित,
मिलिंद चव्हाण
किशोर ढमाले यांचे 30 जून 2011 रोजी आलेले एसएमएसः
ReplyDelete1
Je lok Bramhnanna vait vatel mhanun jativyavasthechi shasriya chrcha taltat te budhachya karunecha ulta vapar karat astat. Ase lok marnonmukh jativyavasteche aushya vadavat astat. Satya ki jay ho !
2
.. Samkalin bhartatil thor etihas ,bhasha ,sanskruti tadnya dr.a.h.salunkesaranche pustak ''shambuk ,eklavya ani zalkaribai ''prasidha zale ahe.. bramhan mitranchya "eklavyacha angtha dronacharyane ghetlach nahi "ashi uneetihasik vidhane eknyabarobarch a.h.salunke ,sharad patil yanchehi mhanane vachat raha. satya ki jay ho !